पुणे
मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेला पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघात हा घातपात असल्याचा संशय त्यांच्या कुटूंबियांसोबतच मराठी पत्रकार संघाने देखील व्यक्त केला होता. त्यानंतर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील यासंदर्भात एक ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. पत्रकार शशिकांत वारीसे यांचा खून राजकीय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
नाणारच्या जमिनींचा व्यवहार बाहेर काढला त्यामुळे वारीसे यांचा खून झाला. वारिशे काही स्थानिक नेत्यांना खुपत होते. फडणवीसांच्या सभेनंतर 24 तासांत त्यांची हत्या झाली, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट करून म्हटले की, “व्यक्ती को कुचल देनेसे विचार नही मरता. पत्रकार शशिकांत वारीसे यांचा खून राजकीय आहे. नाणार परिसरात नेत्यांनी बेनामी जमीन खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे. त्या सर्व सावकार आणि जमीनदारांनी मिळून शशिकांत यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली. शशिकांतचा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर?” असे ट्वीट करत संजय राऊत यांनी उदय सामंत याचा एक फोटो पोस्ट केला आहे.