पुणे
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैगिंक छळाचे आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे.
बृजभूषण सिंह हे नॅशनल कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पूनिया, साक्षी मलिक आणि अन्य कुस्तीपटू हे आंदोलनाला बसले आहेत. बृजभूषण सिंह हे हुकूमशाही करतात, त्यांनी महिला कुस्तीपटूंचे शारीरिक शोषण केले आहे, असे आरोप या कुस्तीपटूंनी केले आहेत.
बृजभूषण यांनी महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शौषण केलंय. तसेच डब्ल्यूएफआयच्या अधिकाऱ्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने केला आहे. मी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितंल आहे. आता मला माहित नाही की तो (बृजभूषण) मला जगू देईल की नाही. मला वारंवार जीवे मारण्याची धमकी येत आहे’, असं विनेश फोगाटने म्हटलं आहे.
महिला कुस्तीपटूंना विविध प्रकारच्या समस्या असतात. मात्र, अध्यक्षांकडून महिला खेळाडूंचं शोषण करण्यात आलं. ज्या महिलांनी या गोष्टीला नकार दिला त्या खेळाडूंवर फेडरेशन जाणीवपूर्वक बंदी घातली असल्याचा आरोपही विनेश फोगाटने केला आहे. इतकंच नाही तर, कोणत्याही खेळाडूला काहीही झालं तरी त्याला जबाबदार अध्यक्ष राहतील, असा इशाराही त्यांनी कुस्ती फेडरेशनला दिला आहे.
दरम्यान, महिला कुस्तीपटूंच्या या आरोपांनंतर बृजभूषण सिंह यांनी तत्काळ समोर येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. बृजभूषण यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून असं काही घडलं असल्यास मी स्वतः फाशी घेईन, लैंगिक शोषणाचा कोणताही प्रकार झालेला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.