पुणे
राज्यात कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जनतेला कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हे गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असून ठिकठिकाणी जाऊन गर्दी जमवत असल्याचे दिसून येत आहे.
शेख हे ज्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत त्या ठिकाणी मोठी गर्दी तर होतेच मात्र कोरोना बाबतचे कोणतेही नियम त्या ठिकाणी पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आता याच मुद्द्यावरून भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. सर्वांसाठीच कडक निर्बंध राज्य सरकारने जाहीर केलेले आहेत परंतु राज्य सरकार मध्ये असलेल्या पक्षाचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना त्यात सूट आहे असे राज्य सरकारने अधिकृत जाहीर करूनच टाकावे. कारण सर्वसामान्यांनी कोणता कायदा मोडला तर तातडीने कारवाई केली जाते परंतु सत्ताधारी पक्षातील नेता, पदाधिकारी यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही आणि सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी स्वतःच्याच पक्षाच्या आदेशाला केराची टोपली दाखवताना दिसत आहेत असं देसाई म्हणाल्या.
औरंगाबादेत बलात्काराचा गुन्हा दाखल असलेला राष्ट्रवादीचा युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख समाजात पुन्हा एकदा स्वतःची चांगली प्रतिमा बनविण्यासाठी अनेक कार्यक्रमांना उपस्थित असतात. परंतु स्वतःची चांगली प्रतिमा बनविण्याच्या नादात नियम पाळायचे विसरतात आणि दुसऱ्यांनाही सांगत नाहीत.असल्या पदाधिकारी आणि नेत्यांवर तातडीने गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे अशी मागणी देसाई यांनी केली आहे.