पुरंदर
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दौंडज (ता. पुरंदर, जि. पुणे) या गावात सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात एकूण 75 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. शिबिरादरम्यान विविध उपक्रम राबविण्यात आले. गावातील महादेव मंदिर आणि भैरवनाथ मंदिराची तसेच त्यांच्या प्रांगणाची स्वच्छता करण्यात आली. सामाजिक जनजागृतीसाठी स्वयंसेवकांनी प्रभातफेरी काढली आणि महादेव मंदिरात समाजप्रबोधनपर नाट्य सादर केले. तसेच, गावातील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांबाबत माहिती देण्यात आली.
शिबिरादरम्यान शिवव्याख्याते किरण टेकवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान दिले. शिबिरासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन कोकणे, प्रा. चंद्रकांत भांगे आणि उद्धव वायकर यांचे मार्गदर्शन लाभले.
शिबिराचे नेतृत्व राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी राजेश टेकवडे आणि उत्कर्ष पिंगळे यांनी केले.
संस्थेचे सचिव मालोजीराजे छत्रपती यांनी या सामाजिक कार्याबद्दल स्वयंसेवकांचे अभिनंदन केले. तसेच शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.