अल्पवयीन मुलीवर बाप करत होता अत्याचार, गरोदर राहिल्याने पुण्यातील तरुणाशी दिलं लग्न लावुन

अल्पवयीन मुलीवर बाप करत होता अत्याचार, गरोदर राहिल्याने पुण्यातील तरुणाशी दिलं लग्न लावुन

पंढरपूर

बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने ती गरोदर झाली. त्यानंतर गर्भवती लेकीचा त्याने एका तरुणासोबत  घाईघाईत विवाह उरकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला असून तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी वडील आणि पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात घडलेल्या या घटनेमुळे ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे.

पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या वडिलांनी गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली होती.

यातून ती गरोदर राहिली असल्याचं समजताच त्यांनी तिचा विवाह पुणे येथील तरुणाबरोबर लावून दिला.

विवाह झाल्यानंतर काही महिन्यांतच मुलीला त्रास होऊ लागला. यामुळे ती माहेरी आली. नंतर वडिलांनी तिला पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र तिची प्रकृती गंभीर झाली.

पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

पीडितेला मुलगी झाली, मात्र ती स्वतः अल्पवयीन असल्यामुळे डॉक्टर आणि पोलिसांनी याबाबत तिच्याकडे चौकशी केली.

तेव्हा तिने गेल्या आठ महिन्यांपासून वडील अत्याचार करत असल्याचं सांगितलं. मी गरोदर राहिल्याने त्यांनी माझा विवाह लावून दिला. नंतर पतीनेही अत्याचार केल्याचा दावा तिने केला.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा विवाह लावून दिल्या प्रकरणी पोलिसांनी वडील आणि पती या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटकही केली आहे.

या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून वडिलांनी मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *