पुणे
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. कालच या निवडणूकीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. या प्रचारसभेत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. चिंचवडमधील राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारसभेत त्यांनी नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंचा वांद्रे येथे एका बाईने पराभव केला होता, असे अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर नारायण राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
अजित पवारांच्या या टोलेबाजीला नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “अजित पवारांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं, हे मला माहीत नाही. त्यांनी माझ्या नादी लागू नये,” नाहीतर मी पुण्यात येऊन त्यांचे बारा वाजवेन, असा थेट इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
त्याचबरोबर पुढे बोलताना त्यांनी “खरं म्हणजे मला त्याच्याबद्दल बोलायचेच नाही. तो ज्याप्रकारचा राजकारणी आहे, त्याबद्दल बोलूच नये. बारामतीच्या बाहेर त्याने दुसऱ्यांचे बारसे घालायला जाऊ नये. दुसऱ्यांना नावं ठेवू नये,” अशा शब्दात अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.