जुन्नर
शिरोली बुद्रुक येथील अक्षय मोहन बोऱ्हाडे हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. समाजसेवा करणारा म्हणून सोशल मीडियामध्ये तरुणांच्यात क्रेझ असलेल्या अक्षय बोऱ्हाडेने गॅस वितरकाकडे खण्डणीची मागणी करत जीवे मारल्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा जुन्नर पोलिसांनी त्याला अटक केली.
जुन्नर येथील एच पी गॅस वितरक रुपेश प्राणलाल शहा याचे नागरी वस्तीत गॅस सिलिंडरचे गोदाम असल्याप्रकरणी अक्षय बोऱ्हाडे याने माहिती अधिकारातून जुन्नर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातून माहिती मागवली होती. याप्रकरणी त्याने शहा यांना फोनकरून पैशाची मागणी केली. ‘माझी माणसे पाठवली आहेत, त्यांच्याकडे पैसे दे. तसेच माझ्या संस्थेला येणारा खर्च उचल. नाहीतर मी फेसबुक लाईव्ह करेन आणि मग तुझा व्यवसाय कसा चालतो हेच बघतो,’ अशी धमकी बोऱ्हाडे याने दिली.
नंतर रुपेश शहा यांनी प्रतिसाद न दिल्याने त्याने पुन्हा जून २०२१ मध्ये फोन करून पैसे दे नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली. खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी अक्षय बोऱ्हाडे यास अटक करून बुधवाररोजी प्रथम वर्ग जुन्नर न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, याआधी देखील अक्षय बोऱ्हाडे हा अनेकदा चर्चेत आला आहे. फेसबुक लाईव्हद्वारे आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी जुन्नर येथील शिवसेनेच्या नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी कारवाई करणेबाबत निवेदन देखील दिले आहे.