नालासोपारा
अंगात भूत आल्याच्या नावाखाली नालासोपाऱ्यात अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे. संबंधित घटना ही बुधवारी (15 सप्टेंबर) संध्याकाळी साडेसात वाजेची आहे. तेथील एका नागरीकाने हा मारहाणीचा व्हिडीओ मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. भूतबाधा, करणीच्या नावाखाली आपल्याकडे लोक येतात आणि मी त्यांना भंडारा, अंगारा देऊन त्यांना बरे करतो असा दावाही या बाबाने केला आहे. सध्या पीडित महिलेची मानसिक स्थिती बिघडली असून ती बोलण्याच्या स्थितीत नाही.
नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे गावाजवळील आदिवासी पाड्यातील एक व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. या ठिकाणी श्री भैरवनाथ बाबा नावाचे मंदिर आहे. या मंदिराचा बाबा पुजारी याच मंदिरात आपली भोंदूगिरी चालवत आहे. हा भोंदू बाबाने कशाप्रकारे महिलेला मारहाण केली आहे ते संबंधित व्हिडीओत दिसत आहे. महिलेच्या अंगात भूत शिरलयं आणि ते काढण्यासाठी भोंदू बाबा तिला मारहाण करतोय. तिच्या अंगावर पाणी फेकतोय, तिच्या कपाळावर इबित लावतोय. हे सर्व चाळे तो भूत पळवण्याच्या नावाखाली करत आहे. ज्या महिलेला मारहाण झाली आहे ती महिला याच मंदिराच्या बाजूला एका पत्र्याच्या घरात राहते.
महिलेच्या पतीनेच तिला इथे आणल्याचे बाबाने सांगितलं. त्याचपबरोबर हे मंदिर 1988 पासून आहे. कुणालाही भूतबाधा, करणी झाली तर लोक घेऊन येतात, मी त्यांना मंतरतो आणि ते बरे होतात, असा दावाही हा बाबा करत आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे गावाजवळील आदिवासी पाडतील हे श्री भैरवनाथ बाबाचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराचा पुजारी हा हेमराज नागदा आहे. त्याच्या म्हणण्यानुसार हे मंदिर 1988 साली स्थापन झालं आहे. या मंदिरात भूत पळवण्याचं काम मागील 10 ते 12 वर्षांपासून हा भोंदू बाबा करत असल्याचं तेथील नागरीकांनी सांगितलं आहे.
मुंबईला काम करणारी सोनी संजय राजभर ही काही दिवसांपासून मानसिक आजारी आहे. बुधवारी ती घरी थकलेल्या अवस्थेत आल्यावर तिच्या पतीने तिला भोंदूबाबा हेमराज नागदा याच्याकडे नेलं. त्या भोंदू बाबाने तिच्या घराच्या बाजूला राहणारा एक मुलगा जो चार महिन्यांपूर्वीच तलावात बुडून मृत झालाय त्याचा भूत तिच्या अंगात चढल्याचा जावई शोध लावला. त्यानंतर त्या बाबाने महिलेला अमानुष मारहाण सुरु केली. त्या महिलेला देखील काहीच कळलं नाही. मात्र एका सुज्ञ नागरीकाने या मारहाणीचा व्हिडीओ काढून या भोंदू बाबाचा भंडाफोड केला आहे.
आजूबाजूच्या नागरीकांना विचारल्यावर हा भोंदू बाबा भूत काढण्याच्या नावाखाली महिला, लहान मुलं पुरुष यांना मारहाण करत असल्याच सांगितलं आहे. यावर आवाज उठवल्यास जातीय रंग देवून, त्याला वेगळं वळण दिवं जात असल्याने कुणी पुढे येत नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं.