पुणे
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील नागाव येथे एक धक्कादायक घटना घडली. अंत्यविधीच्या वेळी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असताना घडलेल्या या प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ पसरली.
नातेवाईकांनी मृतदेह रस्त्यातच सोडून पलायन केले. या घटनेतील तीन जखमींवर पोरोळा कुटीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पारोळा तालुक्यातील नगाव येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईक जमा होऊन त्यांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सोबत घेतला.
गावातून या मृत व्यक्तीची अंत्ययात्रा काढण्यात आली. मात्र स्मशानभूमीकडे जाताना अचानक मधमाशांचे पोळे उठले. या चिडलेल्या मधमाशांनी अचानक अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या लोकांवर हल्ला केला. अंत्यसंस्कारातील अनेक लोकांना या मधमाशांनी दंश केला.
मधमाशांनी अचानक हल्ला केल्यानंतर अंतयात्रेत सहभागी झालेल्या नातेवाईकांना मृतदेह रस्त्यात सोडून पलायन केले. प्रत्येक जण वाट दिसेल तिकडे पळून जात होता. शोकाकूल नातेवाईकांनी मृतदेह रस्त्यातच सोडून दिला. मधमाशांच्या या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.पोराळे कुटीर रुग्णालयात साधु भागा भिल (वय ७५), ओंकार शंकर भिल (वय ६५), मधुकर सजन भिल (वय ५५) हे गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर उपचार सुरु आहेत.
अंतयात्रेतील इतर नातेवाईकही जखमी आहेत. मात्र त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडून देण्यात आले आहे. दरम्यान, सध्या मधमाशांनी हल्ला करण्याचे प्रकार वाढत आहेत. कर्नाळा किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवरही १५ फेब्रुवारीला मधमाशांनी हल्ला केला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता.