पुणे
किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती संभाजी महाराजांवर देशभरात लोकांची विशेषतः युवकांची प्रचंड श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी लाखो शंभूप्रेमी पुरंदर किल्ल्यावर जाऊन राजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात. अशा या पुरंदर किल्ल्याचा विकास आराखडा बनवावा, अशी मागणी आमदार विजय शिवतारे यांनी विधानसभेत केली.
या किल्ल्यावरील महाराजांचे जन्मठिकाण, ज्या वाड्यात ते प्रत्यक्ष राहिले ते ठिकाण, किल्ल्यावरील पुरातन महादेव मंदिर, केदारेश्वराचे मनमोहक आणि अत्यंत प्राचीन मंदिर, मुरारबाजी देशपांडे यांनी किल्ल्यावर गाजवलेले शौर्य, बाजूलाच असलेला वज्रगड हा पुरंदरचा जोडकिल्ला, भैरवखिंडीतून वज्रगडावर जाणारी वाट, किल्ल्यावरील मोठमोठी दगडी प्रवेशद्वारे, तटबंदी, जमीनदोस्त झालेली राजगादी, ढासळलेले बुरूज या सर्वांचे जतन करणे आवश्यक आहे.
त्यासाठी किल्ल्याचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्याचे आदेश पुरातत्व विभाग आणि पुणे विभागीय आयुक्तांना द्यावेत, अशी मागणी आमदार विजय शिवतारे यांनी विधिमंडळात केली.
या वेळी सभागृहात औचित्याच्या मुद्द्याआधारे शिवतारे यांनी पुरंदर किल्ल्याचा विषय सभागृहात मांडला. शिवतारे म्हणाले, पुराणात पुरंदर म्हणजे साक्षात इंद्र असा उल्लेख आहे. पुरंदर पर्वताला इंद्रनील पर्वत असे संबोधण्यात आलेले आहे.
हा किल्ला राष्ट्रकूट राजांच्या काळात म्हणजे 7 व्या शतकात बांधलेला असून, पुढे तो बहामनी राजांच्या ताब्यात गेला. याच काळात त्याचे नूतनीकरण करण्यात आले. त्यानंतर तो निजामशाही, आदिलशाही करीत हिंदवी स्वराज्यात सामील झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई याच किल्ल्यापासून अवघ्या काही अंतरावर खळद-बेलसर परिसरात झाली. पुरंदरचा ऐतिहासिक तह, मुरारबाजीचे शौर्य, संभाजी महाराजांची जडणघडण अशी प्रचंड मोठी पार्श्वभूमी या किल्ल्याला लाभलेली आहे. सध्या किल्ल्यावरील जुनाट अवशेष भग्न अवस्थेत आहेत.
देशभरातील शंभूभक्तांची या किल्ल्याच्या डागडुजी करावी, अशी मागणी आहे. हे सर्व लक्षात घेऊन या किल्ल्याचे जतन करण्यासाठी सर्वंकष विकास आराखडा बनवण्याचे आदेश पुरातत्व विभाग, विभागीय आयुक्त, पुणे आणि जिल्हाधिकारी, पुणे यांना होणे आवश्यक आहे.
शिवतारे म्हणाले, शिवनेरी किल्ल्यावर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अनेक मंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मसोहळा संपन्न होत असतो. त्याच पद्धतीने पुरंदर किल्ल्यावर शासकीय पद्धतीने होणार्या संभाजी महाराज जयंतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीव मंत्री यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. शासनाने याबाबत आपली भूमिका जाहीर करावी आणि किल्लासंवर्धनासाठी विकास आराखडा तत्काळ बनवण्याचे आदेश द्यावेत.