मुंबई
अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले आहे. काल रात्री झालेल्या कारवाईनंतर एनसीबीने आर्यन खानचे नाव गुप्त ठेवले होते. मात्र, आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रेव्ह पार्टीवर धाड टाकण्यात आली तेव्हा आर्यन खान त्याठिकाणी उपस्थित होता. याठिकाणी एमडी, कोकेन आणि चरसचा मोठा साठा मिळाला. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ही रेव्ह पार्टी सुरु होती. या क्रूझवर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी निघून ही बोट सोमवारी मुंबईत परतणार होती. या क्रूझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती. हायप्रोफाईल पार्टी असल्याने एनसीबीने शेवटपर्यंत या ऑपरेशनविषयी गुप्तता बाळगली होती.