पुणे
भाजपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्यायचा आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपली सत्ता येत नाही, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मीच राजीनामा देतो,’ असे नाटक सुरू करून देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे व पवार यांच्यावर नैतिक दडपण आणण्याचा डाव टाकला आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
भाजपला शिवसेना व राष्ट्रवादी फोडून काहीच उपयोग झाला नाही, महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला पूर्णपणे नाकारले हे लक्षात आल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी खेळी सुरू केली आहे,’ असा आरोप तपासे यांनी केला. ‘आता भाजपला शिवसेना आणि राष्ट्रवादी नकोशी झाली असून, त्यांचा राजीनामा घ्यायचा असल्यानेच हे नाट्य वठवले जात आहे,’ असा दावा तपासे यांनी केला.
राष्ट्रवादीच्या यशाबद्दल बोलताना तपासे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. ‘अजित पवार हे शरद पवार यांना घरी बसून मार्गदर्शन करण्याचे सुचवत होते; परंतु ८४ वर्षांच्या योद्ध्याचा स्ट्राइक रेट ८० टक्के असल्याचे दिसून आले, तर ४० आमदार सोबत असलेल्या अजित पवारांना एकच खासदार निवडून आणता आला,’ अशीही टीका तपासे यांनी केली.