पुणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये रविवारी नागपूर येथील राजभवनात ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.यंदा महायुतीतील तीनही पक्षांनी धक्कातंत्राचा अवलंब करत काही जुन्या चेहऱ्यांचा पत्ता कट केल्याचं पाहायला मिळालं.
यामध्ये पुरंदरचे शिवसेना आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचाही समावेश आहे. मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याने आमदार शिवतारे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.
“महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. कारण इथं प्रादेशिक समतोल न राखता जातीय समतोल राखण्यासाठी प्राधान्य दिल्याचं दिसत आहे,” असा हल्लाबोल विजय शिवतारे यांनी केला. तसंच पुढे बोलताना शिवतारे म्हणाले की, “मला मंत्रिपद मिळालं नाही, याचं जास्त वाईट वाटत नाही. मात्र महायुतीतील तीनही नेत्यांनी जी वागणूक दिली, ती चुकीची आहे.
हे नेते साधे भेटायलाही तयार नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळात फेरबदल करून नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाईल, असं महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं आहे.
त्यानुसार तुम्हाला अडीच वर्षांनी मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं आहे का, असा प्रश्न विजय शिवतारे यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी म्हटलं की, “आता अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी मी ते घेणार नाही. आम्ही या नेत्यांचे गुलाम नाही,” असं म्हणत शिवतारे यांनी आपल्या आक्रमक भावना व्यक्त केल्या.