Big Breaking !!!!   अमित झेंडे सभापती, प्रवीण जगताप उपसभापती;पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी-शिवसेनेची अनपेक्षित युती

Big Breaking !!!! अमित झेंडे सभापती, प्रवीण जगताप उपसभापती;पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी-शिवसेनेची अनपेक्षित युती

पुणे

पुरंदर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत सोमवारी नाट्यमय राजकीय घडामोडी घडत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अनपेक्षित युती झाली. या युतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित झेंडे यांची सभापतीपदी तर शिवसेनेचे प्रवीण जगताप यांची उपसभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली. या मनोमिलनामुळे पुरंदर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. 

पुरंदर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेनेचे दोन आणि भाजपाचे दोन सदस्य निवडून आले होते. सभापती निवडीसाठी आवश्यक असलेले पाच सदस्य कोणत्याही पक्षाकडे नसल्याने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे किंगमेकरची भूमिका होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत की शिवसेनेसोबत युती करणार याबाबत रविवारी सायंकाळपर्यंत अनिश्चितता होती. 

 मात्र सोमवारी सकाळी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना (शिंदे गट) सोबत युती करत उपसभापती पद शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतला. राजकीयदृष्ट्या भाजपसोबत युती होण्याची शक्यता अधिक मानली जात होती. परंतु राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर आणि विद्यमान आमदार विजय शिवतरे यांच्याशी साधलेले राजकीय समन्वय लक्षात घेऊन अखेर शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. 

यंदा सभापती पद नागरिकांच्या मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गासाठी राखीव असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवे गणातून निवडून आलेले अमित झेंडे हे प्रमुख दावेदार मानले जात होते. सोमवारी सकाळी पुरंदर पंचायत समितीच्या कार्यालयात झालेल्या निवड प्रक्रियेत त्यांची सभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली. 

या निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोळविहीरे गणातून निवडून आलेल्या गटनेत्या स्मिता निगडे, गराडे गणातून निवडून आलेल्या अर्चना कटके तसेच निरा गणातून निवडून आलेल्या मोनिका कांबळे उपस्थित होत्या. 

 शिवसेना (शिंदे गट) कडून वीर गणातून निवडून आलेले प्रवीण जगताप यांची उपसभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या सोबत बेलसर गणातून निवडून आलेले माणिक निंबाळकर उपस्थित होते. दरम्यान, भाजपचे भिवडी गणातील सायली मनोज शिंदे आणि माळशिरस गणातील माऊली यादव हे सदस्यही सभेला उपस्थित होते. 

या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी काम पाहिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापती पदाची निवड जाहीर करण्यात आली तसेच निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *