पुणे
पुरंदर तालुक्यातील पिंपळे गावच्या दातेमळा बसस्टॉपजवळ रविवारी (दि.१४) दुपारी १२.३० च्या सुमारास ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला.
जिंतेद्र शशिकांत पवार (वय २५, रा. भादवडे, ता. खंडाळा, जि. सातारा), असे अपघातातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मोटारसायकलवरून सासवडकडे जात असताना हा अपघात घडला.
ट्रकचालक विजय पांडुरंग कदम (वय ५५, रा. दरुज, ता. खटाव, जि. सातारा) यांच्या बेपर्वाईमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलीस तपासात पुढे आला आहे. ट्रक सासवडकडून वीर बाजूकडे भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या जिंतेद्रच्या मोटारसायकलला धडक बसली. यात जिंतेद्रच्या हात, पाय आणि डोक्यास गंभीर दुखापती होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच त्याचा नातेवाईक नवनाथ कामठे हे ग्रामीण रुग्णालय सासवड येथे पोहोचले. डॉक्टरांनी तपासून जिंतेद्रला मृत घोषित केले. घटनेची नोंद सासवड पोलीस स्टेशनला केली असून संबंधित ट्रक चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.