पुणे
कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. यादरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सीमाभागातील निपाणीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला.
कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादीवर देवेंद्र फडणवीस यांनी साडेतीन जिल्ह्याचा पक्ष अशा खोचक शब्दात हल्ला चढवला. निपाणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्तम पाटील यांना तिकीट दिले आहे, तर राष्ट्रवादीचे कार्नाटक विधानसभेत एकूण ९ उमेदवार रिंगणात आहेत.
प्रचार सभेत बोलताना फडणवीसांनी राष्ट्रवादी पक्षाची खिल्ली उडवली आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा एक पक्ष आणि आता इथे अख्ख्या कर्नाटकमध्ये त्यांचा एक उमेदवार दिला आहे. तो उमेदवार इथे (निपाणी) आहे.
हा पक्ष काय डोंबले करणार आहे इथे येऊन? खरं म्हणजे ही यांची मिली जुली कुस्ती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिली जुली कुस्ती सुरू आहे, हे एकच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅक करून महाराष्ट्रात पाठवून द्या, आम्ही पाहून घेऊ असं देखील आवाहन फडवीसांनी मतदारांना केले.