पुणे
पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असून, पुणे जिल्हाधिकारी यांनी तातडीने जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.हे विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर महाराष्ट्रातील विमानसेवा अधिक सक्षम होईल, अशी आशाही व्यक्त केली.
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामासंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठी नूतनीकरण व विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत. शिर्डी विमानतळावर नवीन एटीसी इमारत, एकात्मिक मालवाहतूक इमारत व टर्मिनल इमारतीची कामे प्रस्तावित असून ही कामे पूर्ण होणे आवश्यक.कामांची गती संथ असल्याचे नमूद करून आवश्यक असल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वापरावे तसेच विमानतळासाठी आवश्यक असणारी खरेदी व स्ट्रक्चरल डिझाईनची कामे येत्या आठवड्यात पूर्ण करावीत, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या.
शिर्डी विमानतळ हे मुंबई व नवी मुंबई विमानतळांच्या जवळचे विमानतळ आहे. तेथील लहान विमाने उभी करण्यासाठी शिर्डी विमानतळाचा वापर होऊ शकतो. यासाठी शिर्डी विमानतळावर आवश्यक सुविधा उभारण्यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त जमीन संपादित करण्याची प्रक्रिया हाती घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.