पुणे
अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी रस्त्यावरील वडाळे वस्ती परिसरात मंगळवारी (ता.1) सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या गुन्ह्याची उकल करून लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या तीन तासांच्या आत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. शेवाळवाडी येथील सतीश वाघ प्रकरणानंतर बायकोनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे हे दुसरे प्रकरण आहे. यामुळे लोणी काळभोर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रवींद्र काशिनाथ काळभोर (वय 45 पत्ता – वडाळे वस्ती , टाकेचा माळ, रायवाडी रोड, लोणी काळभोर) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर शोभा रविंद्र काळभोर (वय ४2) व गोरख त्र्यंबक काळभोर (वय 41, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रवींद्र यांचे भाऊ भाऊसाहेब काशिनाथ काळभोर (वय-48, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र व शोभा काळभोर हे नात्याने पती-पत्नी आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. रवींद्र हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रवींद्र यांना दारुचे व्यसन होते. दरम्यान, मंगळवारी (ता.1) सकाळी रवींद्र काळभोर हे घराच्या बाहेरील पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात जखमी व बेशुध्द अवस्थेत आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रवींद्र काळभोर यांना लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी रवींद्र यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. रवींद्र काळभोर यांचा कोणीतरी खून केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता.
त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासाला सुरुवात केली असता, शोभा काळभोर यांचे गोरख काळभोर यांच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, अनैतिक संबंधात अडसर होत असल्याने रवींद्र काळभोर यांचा कायमचा काटा काढायचा आरोपींनी कट रचला होता, अशी माहिती समोर आली.
त्यानुसार सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमरास रवींद्र काळभोर हे पलंगावर झोपलेले असताना, दोन्ही आरोपींनी संगनमत करून त्याच्या डोक्यात फावड्याने वार करून खून केला, अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बी.एन.एस. क. १०३, ३(५) महा. पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्याचा प्रकार हा अतिशय गुंतागुंतीचा व क्लिष्ठ स्वरुपाचा असताना देखील अवघ्या ३ तासांच्या आतमध्ये आरोपी निष्पन्न करुन, लोणी काळभोर पोलीसांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.