मुंबई
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओनंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. महाविकास आघाडीचा महामोर्चा दाखवण्यासाठी राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता. मात्र तो व्हिडिओ मराठा क्रांती मोर्चामधील असल्याचा दावा करण्यात आला ज्यामुळे मराठी संघटना आक्रमक झाल्या असून राऊत यांना असतील तिथे ठोकून काढू असा इशाराही दिला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटनंतर मराठा संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. राऊतांच्या वक्तव्याविरोधात स्वराज्य संघटनेने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाकडून देखील तक्रारी दाखल केल्या जात आहेत.
त्याचबरोबर नागपुर अधिवेशनात गृहमंत्र्यांची भेट घेत संजय राऊतांना सायबर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचेही मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
संजय राऊत यांच्या ट्विटनंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाली असून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वक अंकुश कदम यांनी संजय राऊत दिसतील तिथे ठोकून काढू असा इशारा दिला आहे. “सामनामधून मुकमोर्चाला मुकामोर्चा म्हणून संबोधले आज तोच नालायक माणूस आज पक्ष वाचवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे व्हिडिओ टाकत आहे. बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या , छत्रपतींच्या वंशंजांना पुरावे मागणाऱ्याला मोर्चा काढण्याचा अधिकार नाही,” असे अंकुश कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे.
“संजय राऊत यांनी बाळासाहेबांचे विचार धुळीस मिळवले असून खोटे बोलण्यात आणि शब्द फिरवण्यात माहिर आहेत. त्यांच्याविरुद्ध मराठी मुले रस्त्यावर उतरणार आहेत. आपली अब्रू वाचवण्यासाठी मराठी क्रांती मोर्चाचे व्हिडिओ टाकणाऱ्या राऊतांनी आमच्या जातीचा अपमान केला आहे त्याविरोधात आम्ही तक्रार नोंदवू” असाही इशारा या ट्विटमध्ये करण्यात आला आहे.दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनीही ट्विट करत संजय राऊत यांची मराठा मोचाबदल बोलायची लायकी नाही उद्धव ठाकरे यांना आमचे सांगणे आहे की या संजय राऊत यांचे बोलणे बंद करा,” असा इशारा दिला आहे.