(संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी धाराशिव जिल्हा)
शेतरस्त्याच्या अंतिम निकालावर तहसीलदारांची सही घेवुन निकालाची प्रत देण्यासाठी एका शेतकऱ्याला दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या धाराशिव तहसील मधील महिला महसूल सहायक स्वाती खताळ यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक पथकांने कारवाई केली आहे. खताळ यांनी लाच मागितली पण एसीबीने सापळा लावल्याचा संशय आल्याने लाच स्वीकारली नाही. मात्र लाच मागणे गुन्हा असल्यांने खताळ यांच्याविरुद्ध एसीबीने कारवाई केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव तालुक्यांतील एका गावातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात शेतरस्ता मिळावा म्हणून प्रकरण दाखल केले होते. प्रकरण चालवल्यानंतर अंतिम निकाल देण्यात येणार होता. हा निकाल टंकलिखित झाल्यानंतर त्यावर तहसीलदारांची सही घेवुन निकालाची प्रत देण्यासाठी यापूर्वीच १० हजार रुपये लाचेची मागणी झाली होती.
महसूल सहायक स्वाती ज्योतीराम खताळ यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे २१ जून, २६ जून व १७ जुलै रोजीच्या रेकॉर्डिंगच्या पुराव्यांवरुन समोर आले आहे. एसीबीच्या पथकांने सापळा लावल्यांचा संशय आल्यांने स्वाती खताळ यांनी लाच मागितली, पण स्वीकारली नाही. याप्रकरणी महसूल सहायक स्वाती खताळ यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी आनंदनगर पोलीस गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.
ही कामगिरी एसीबीचे पोलीस निरीक्षक सापळा अधिकारी विकास राठोड, पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे, आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, विष्णू बेळे, सचिन शेवाळे यांच्या पथकांने केली.
आरोपी महिलेचा शिपाई ते लिपिक असा होता प्रवास
स्वाती खताळ या २०१० मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून रुजू झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात त्यांनी शिपाई म्हणून काही वर्षे काम केले. त्यानंतर त्यांची पदोन्नती महसूल सहायक म्हणून झाल्यानंतर त्या धाराशिव तहसील कार्यालयात रुजू झाल्या. त्यांच्याकडे शेतरस्ते सुनावण्यासंदर्भ खात्यांतील कार्यभार होता.