सोलापूर
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी राजा मेटाकोटीला आला. यात भर म्हणून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कवडी मोलाचा दर देऊन प्रशासनानेही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. सोलापुरातल्या एका शेतकऱ्याला चक्क दोन रुपयांचा चेक देऊ त्याची घोर चेष्टा केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीन, कापूस, तूर, कांदा इत्यादी शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याचं चित्र आहे.
शेतकऱ्यांनी बाजारात चांगला दर मिळेल या आशेवर सोयाबीन, कापूस तूर, कांदा घरीच साठवून ठेवला आहे. कांद्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचं चित्र आहे. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये यामुळं संतापाची लाट पसरली आहे.सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी राजेंद्र चव्हाण हे दिवसभर काबाडकष्ट करून आपल्या शेतीत सोनं पिकवण्याच स्वप्न धरून ते प्रामाणिकपणे गेले अनेक वर्ष शेती करतात.
यंदा त्यांनी आपल्या शेतात कांद्याचे पीक घेतले. कांदा पिकला, तयार झालेल्या कांद्याला योग्य भाव मिळेल म्हणून हा कांदा बाजार समितीत आणला. बाजार समितीने राजेंद्र चव्हाण यांच्या हातात चक्क दोन रुपयांचा चेक दिल्याने राजेंद्र चव्हाण यांच्या तोंडच पाणी पळाले. दहा पोती कांदा आणि मोबदल्यात केवळ दोन रुपये. हा चेक बघून राजेंद्र चव्हाण यांच्या डोळ्यात पाणी धरलं आणि ते निराशही झाले.