मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटांची निर्मिती गेल्या काही काळात वाढली आहे. या चित्रपटांमध्ये इतिहासाची छेडछाड करुन, विपर्यास केला जातो, असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी केला. तसेच असं करणाऱ्यांची गाठ माझ्याची आहे असा इशाराही त्यांनी दिला. संभाजीराजेंच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
ही परंपरा बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरु केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं की, “महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा चुकीचा, खोटा इतिहास मांडण्याची परंपरा पुरंदरे यांनी सुरु केली, जाणता राजा हे महानाट्य हे त्याचे एक रुप कारण त्यांचे लिखित पुस्तक होते. तीच परंपरा आता चित्रपटसृष्टीत काहीजण करत आहेत.
आम्ही विरोध करुच पण संभाजीराजे ह्यांच्या रुपाने एक आवाज मिळाला.”संभाजीराजे छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘वेडात वीर दौडले सात’या चित्रपटांवर आक्षेप घेतले आहेत. पुण्यात पत्रकार परिषद घेत संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.
यावेळी त्यांनी ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर यांचा ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांचा उल्लेख केला आहे.’वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले कलाकार हे मावळे आहेत का? हा इतिहासाचा विपर्यास आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा महेश मांजरेकरांचा सिनेमा आहे.
त्यातील कलाकारांनी पगडी घातलेली नाही. पगडी काढणे म्हणजे शोक समजला जातो. चुकीचा इतिहास दाखवलात तर गाठ माझ्याशी आहे. संभाजी राजे यांनी चित्रपट निर्मात्यांना उद्देशून, सिनेमॅटिक लिबर्टी सध्या सुरू आहे ते ठीक आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रपटाला हे चालू देणार नाही.