शिवतारेंनी अंगणवाडी पण नाही काढली अस म्हणता ; मग खासदार सुळेंची कामे दाखवा हजार रुपये मिळवा , राष्ट्रवादीला आव्हान

शिवतारेंनी अंगणवाडी पण नाही काढली अस म्हणता ; मग खासदार सुळेंची कामे दाखवा हजार रुपये मिळवा , राष्ट्रवादीला आव्हान

पुरंदर

शिवतारे यांनी साधी अंगणवाडी काढली नसल्याचं विधान युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी केलं आहे. माझं त्यांना आव्हान आहे. तुमच्याच गावातील सासवड परिंचे वीर रस्ता, परिंचे हरणी रस्ता, १७ सिमेंट बंधारे, एसटी स्थानक, पिलाणवाडी बंद जलवाहिनी अशी जवळपास ३५ कोटींची कामे मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही खासदार सुप्रिया सुळे यांची फक्त ३५ लाखांची कामे दाखवा अशा शब्दात युवासेनेचे पुरंदर तालुकाध्यक्ष मंदार गिरमे यांनी राष्टवादी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे. सासवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष डॉ. राजेश दळवी, नगरसेवक सचिन भोंगळे, अस्मिता रणपिसे, सुरज जगताप, मंगेश भिंताडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

गिरमे म्हणाले, विजय शिवतारे यांनी मागच्या पाच वर्षात पुरंदर तालुक्याचा कायापालट केला हे संपूर्ण तालुका जाणतो. विद्यमान खासदार आणि आमदारांनी पुरंदर तालुक्याची मागच्या तीन वर्षात वाट लावली. शिवतारेंच्या काळात पुरंदर हवेली तालुका निधीच्या बाबतीत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर होता. आता कार्यसम्राट आमदार-खासदारांच्या काळात तालुका खालून पहिल्या क्रमांकावर असतो. शहराध्यक्ष डॉ. दळवी म्हणाले, शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यात ४०३ किलोमीटर रस्ते, ४५० पेक्षा जास्त बंधारे, ११०० शेततळी, प्रशासकीय इमारत, जेजुरी रुग्णालय, क्रीडासंकुल, आरटीओ कार्यालय, धान्य गोदामे असे असंख्य प्रकल्प तालुक्यात आणले. केंद्राकडून खासदारांनी १५ वर्षात आणलेला एक प्रकल्प दाखवावा असे आव्हान यावेळी श्री. दळवी यांनी दिले. यावेळी युवासेनेचे सूरज जगताप म्हणाले, शिवतारे यांनी नगर जिल्ह्यात आधीच मंजूर असलेला साखर उद्योग विकत घेतला आहे.

ताई फक्त खड्डे बुजवा – डॉ. रणपिसे
पुरंदर तालुक्यात सुळे यांच्या अखत्यारीत हडपसर सासवड जेजुरी हा राष्ट्रीय महामार्ग आहे. खासदारांना त्यावरचे खड्डेसुद्धा कधी बुजवता आले नाहीत. या रस्त्यावर लोक रोजच्या रोज जीव मुठीत धरून प्रवास करतात. खासदारांनी निदान केंद्राकडून तेवढा रस्ता तरी नीट नेटका राहील एवढी काळजी घ्यावी असा टोला नगरसेविका अस्मिता रणपिसे यांनी लगावला.

पुरंदर तालुक्यात राजुरी परिसरात हनुमंत भगत यांच्या मंजूर कारखान्याची राष्ट्रवादीने कशी वासलात लावली या अनुभवातूनच त्यांनी तसा निर्णय घेतला आहे. कारखाना उभारण्यासाठी हवाई अंतराची मर्यादा असते. पुरंदर तालुक्याच्या चारही दिशांना हवाई अंतराच्या मर्यादेत आधीच कारखाने असल्याने नवीन कारखाना होणे अशक्य आहे. आणि शक्य असल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे असेल तर साखर उद्योगात निपुण असलेल्या पवार कुटुंबाला सांगून राष्ट्रवादीने इथे एखादा प्रकल्प उभा करावा असा टोला सूरज जगताप यांनी लगावला.

यावेळी नगरसेविका अस्मिता रणपिसे, सचिन भोंगळे, सागर मोकाशी, धनंजय म्हेत्रे, सुरज जगताप, अविनाश बडदे, मंगेश भिंताडे, अनिकेत जगताप, आदेश जाधव, गणेश फडतरे, नितीन कुंजीर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *