पुणे
पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गवरील दौंड तालुक्यातील पाटस टोलनाका प्रशासनाचे अधिकारी आणि इतर कर्मचारी अशा चार जणांवर यवत पोलीस ठाणे (ता.दौंड) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शासनाचे आदेशाचे पालन न केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांना दिली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,महाराष्ट्र शासनाने आषाढीवारीसाठी पंढरपूरकडे जाणारे सर्व भाविक तसेच वारकऱ्यांच्या वाहनाना टोलमाफी केल्याचे परिपत्रक (दि.०७जुलै) रोजी पारित केले होते, त्याबाबतच्या लेखी सूचना व प्रत्येक्ष स्वरूपात यवत पोलिसांनी पाटस टोलनाका येथील अधिकारी व प्रशासनाला दिल्या होत्या, परंतु यानंतरदेखील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोल नाक्यावर वारकर्यांकडून टोल वसुली करण्यात आली.
पाटस टोलनाका प्रशासनाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा भंग केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पाटस टोलनाक्याचे अधिकारी अजयसिंग ठाकूर,सुनील थोरात,विकास दिवेकर,कर्मचारी बालाजी वाघमोडे यांचे विरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गु.रजि.नं.५५५/२०२२ भा.द.वी कलम 188,34 नुसार गुन्हा दाखल केला असून सदरच्या गुन्हाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करत आहेत.
आषाढी वारीसाठी पंढरपूर कडे जाणाऱ्या वारकर्यांनी कडून टोल वसुली प्रकरण टोल कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग वरील पाटस येथील टोल प्रशासनाकडून स्थानिक वाहनांना देखील टोल आकारला जात असल्यावरून अनेकदा वादाचे प्रकार या टोलनाक्यावर घडलेले आहेत.
यापूर्वी अनेक वेळा शाब्दिक चकमकी, हाणामारीच्या घटना घडलेल्या आहेत, टोल नाका कर्मचारी व अधिकाऱ्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढली असल्याचे स्थानिक नागरिक व वाहन चालक सांगताहेत. टोलनाका प्रशासनाची मनमानी थांबणार का?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.