पुरंदर
माझेही गाव विमानतळ बाधित आहे. गावातील अनेकांच्या जमिनी विमानतळाला जात आहेत. परंतु आमच्या शेतकऱ्यांनी सुज्ञपणे निर्णय घेतलेला आहे. विमानतळावरून सुरु असलेल्या चिखलफेकीत आम्हाला अजिबात रस नाही. शेतकऱ्याच्या पदरात काय पडणार आहे हे पाहूनच शेतकरी आपला निर्णय घेणार आहेत. मिळणारा मोबदला शेतकऱ्यांना पसंत नसेल तर त्यांचा नकाराधिकार अबाधित असल्याची भूमिका शिवतारे यांनी घेतली आहे. त्यामुळे उगाचच शिवतारेंच्या नावाने शिमगा करू नये असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माणिक निंबाळकर यांनी केले आहे. बाधित गावातीन तीन सरपंचानी शिवतारे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत श्री. निंबाळकर बोलत होते.
निंबाळकर पुढे म्हणाले, वास्तविक या लोकांच्या तोंडून आमदार बोलत आहेत. आमदार द्रष्टे आहेत असं ते म्हणतात. पण द्रष्टा कुणाला म्हणतात? भविष्याचा तर्कशुद्ध विचार करून सार्वजनिक हिताचा निर्णय घेणाऱ्या नेत्याला द्रष्टा असं म्हटलं जातं. असा नेता राजकीय तोटा सहन करायला मागेपुढे पाहत नाही. सात गावातील बहुतांश शेतकरी हा अल्पभूधारक आहे. दोन एकर जमिन वाचवण्यासाठी आज आपण विरोध करतोय.
पण विभागणीतून कधीतरी या दोन एकराची एक एकर होणार आहे. एकाची अर्धा होणार आहे. हळूहळू आपण गुंठ्यात येणार आहोत. अशा वेळी शेती आपली उपजीविका करू शकते काय याचा विचार होणं गरजेचं आहे. आमदारांना याच्याशी काडीचं देणंघेणं नाही. त्यामुळे त्यांचे विचार ‘द्रष्टे’ आहेत की ‘नतद्रष्टे’ आहेत हे येणारा काळच आपल्याला दाखवून देईल.
ते पुढे म्हणाले, आज समाधानकारक मोबदला मिळाला तर मुलांना नोकरी, व्यवसाय आणि हातात खेळते भांडवल असा शेतकऱ्याचा तिहेरी फायदा होऊ शकतो. फारच शेतीची आवड असेल तर हातातल्या भांडवलातून पहिल्यापेक्षा दुप्पट तिप्पट शेती घेऊ शकतो. हा साधा, सरळ आणि सोपा विचार शिवतारे यांनी मांडला आहे. तो साधारण माणसाला पटतो. त्यामुळे अनेक शेतकरी आज मोबदला काय मिळणार याची वाट पाहत आहेत.
ते तोंडपाटीलकी करत नाहीत. त्यांनी आपला निर्णयाधिकार शिवतारे, जगताप किंवा कुठल्या सरपंच उपसरपंचाकडे सोपवलेला नाही. त्यामुळे “मोबदला जाहीर करा, मग आम्ही आमचा निर्णय घेऊ” हा शेतकऱ्यांचा पवित्रा योग्य आहे. त्यांनी कुणाला वकीलपत्र दिलेलं नाही असंही निंबाळकर म्हणाले.