लग्नाच्या वेळी बायको व कुटुंबीयांना पोलिस दलात भरती झाल्याची थाप मारली;घरच्यांचे खोटे समाधान करण्यासाठी थेट राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी,पुणे जिल्ह्यातील प्रकार

लग्नाच्या वेळी बायको व कुटुंबीयांना पोलिस दलात भरती झाल्याची थाप मारली;घरच्यांचे खोटे समाधान करण्यासाठी थेट राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी,पुणे जिल्ह्यातील प्रकार

पुणे

बेरोजगार असतानाही एका तरुणाने लग्नाच्या वेळी बायको व कुटुंबीयांना पोलिस दलात भरती झाल्याची थाप मारली होती. परंतु वर्षभरानंतरही तो कुठल्याच पोलिस दलात हजर न झाल्याने कुटुंबीयांनी त्याच्याकडे तगादा लावला होता.त्यांचे खोटे समाधान करण्यासाठी त्या तरुणाने थेट राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात जय राजेंद्र यादव (वय २५, रा. विर्शी, ता. भातकुली, जि. अमरावती) या तोतयाने पोलिस पेहरावात २३ नोव्हेंबर रोजी घुसखोरी केली. पोलिसांचा गणवेश परिधान करीत त्याने केंद्राच्या आवारातील इमारती, कार्यालये व मैदानाचे छायाचित्रण व व्हिडिओ चित्रण केले.केंद्रातील पोलिस अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता तो तोतया पोलिस असल्याचे आढळून आले.

दौंड पोलिस ठाण्यात जय यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखत दौंड पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्याविषयी दौंडचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी सांगितले की, संशयित आरोपीने लग्नाच्या वेळी पत्नीला पोलिस दलात असल्याची थाप मारल्याने तिचे खोटे समाधान करण्यासाठी त्याने पोलिस प्रशिक्षण केंद्र गाठले.

घरच्यांना विश्‍वास वाटावा म्हणून त्याने केंद्रात चित्रीकरण केल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु त्याचे एकूण वर्तन पाहता त्याची सखोल चौकशी सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशाने एक दिवस पोलिस कोठडीत ठेवल्यानंतर जय यादव याची जामिनावर सुटका झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *