सातारा
सातारा जिल्ह्यात सर्वात महत्त्वाची मानली जाणाऱ्या खेड ग्रामपंचायतीवर अखेर आमदार महेश शिंदे गटानं वर्चस्व सिद्ध केले आहे. या ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे गटानं झेंडा रोवला आहे. जनतेने आमदार शशिकांत शिंदे गटास पराभवाचा धक्का दिला आहे.
सातारा जिल्ह्यात सहा ग्रामपंचायतीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची समजली जाणारी खेड ग्रामपंचायतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनलचा विजय झाला आहे. यामध्ये महेश शिंदे गटाला बारा जागा मिळाल्या आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांना मात्र पाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.
या विजयानंतर आमदार महेश शिंदे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. आमदारांना खांद्यावर घेत विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार महेश शिंदे यांनी खेडवासीयांचे आभार मानले.ते म्हणाले दोन खासदार आणि तीन आमदारांनी मला पाडण्यासाठी ताकद लावली होती.
मात्र याचा परिणाम झाला नाही. कारण माझ्या मागे एकनाथ आणि देवेंद्र यांची ताकद आहे. त्यामुळे मी कोणालाही घाबरत नाही. हे दोन्ही नेते केवळ माझ्याच नव्हे तर सामन्यांच्या पाठीशी असल्याचे मत आमदार शिंदे यांनी व्यक्त केले.