मंडल अधिकारी सोमनाथ वांजळेही आरोपी
पुरंदर
वीर येथील सरपंच ज्ञानदेव वचकल, ग्रामसेवक संजय म्हेत्रे, तलाठी नंदकुमार खरात, विजय रामचंद्र धुमाळ यांच्यासह मंडल अधिकारी सोमनाथ वांजळे व इतर एकावर सासवड पोलिसांनी फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. अविनाश शंकर धुमाळ या पुणेस्थित फिर्यादींनी (मूळ गाव- वीर) याबाबत तक्रार दाखल केली आहे. ज्ञानदेव वचकल हे आमदार संजय जगताप यांचे निकटवर्तीय असून नीरा मार्केट कमिटीचे ते विद्यमान संचालकदेखील आहेत.
फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार मौजे वीर ता. पुरंदर येथील गट क्रमांक ६८० ही जमीन फिर्यादी अविनाश धुमाळ यांच्या आईने १९९२ साली विकत घेतली होती. या जमिनीत कुळवहिवाट दाखवून ती बळकावण्याचा प्रयत्न विजय रामचंद्र धुमाळ यांचा अनेक वर्षापासून सुरु होता. या जमिनीला कुळ लागू शकत नाही याबाबत १९९० साली महसूल विभागाचा आदेश झालेला असतानाही हा खटाटोप सुरु होता. विजय धुमाळ यांनी त्यासाठी सरपंच ज्ञानदेव वचकल व ग्रामसेवक संजय म्हेत्रे यांना हाताशी धरून या गटात कुठलेही घर किंवा बांधकाम नसताना दगडी बांधकामाचे घर असल्याची नोंद ग्रामपंचायत दप्तरी केली. पुढे या नोंदीचा आधार घेऊन विजय धुमाळ यांनी न्यायालयाची सुद्धा फसवणूक केली.
सरपंच व ग्रामसेवक यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन दाखवले असता कुठलेही बांधकाम आढळून आले नाही. तरीदेखील अशी नोंद करण्यात आल्याने फिर्यादींनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर विजय धुमाळ यांनी बाहेरून गुंड आणून पहाटे बांधकाम करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा बनव उघड झाल्यानंतर ग्रामपंचायतीने ही नोंद रद्द केली. पण बनावट व बोगस कागदपत्र बनवून जागा लाटण्याचा प्रयत्न त्यातून उघड झाल्याने सासवड पोलिसांनी कलम ४२०, ४६५, ४६८, ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप करीत आहेत.