पुरंदर
महाराष्ट्र सध्या विधानसभेचे वारे वाहत आहे. प्रत्येक मतदारसंघात पक्षाकडून तिकीट मिळवण्यात नेते यशस्वी होत आहेत. तर काही ठिकाणचे नेते हे बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज भरताना दिसत आहेत.
अशातच पुरंदर हवेली मतदारसंघात महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार संजय जगताप यांना तीन दिवसापूर्वी उमेदवारी जाहीर झाली. तर काल महायुतीकडून माजी मंत्री तथा पुरंदर तालुक्याचे माजी आमदार विजय शिवतारे यांना शिवसेना पक्षाची उमेदवारी जाहीर झाली.
परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच अपक्ष उमेदवारी अर्ज भरणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते तथा माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्याचे पाहायला मिळाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
याचा अर्थ असा की ज्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने महत्वाची लढत होणार होती त्या उमेदवारांना संभाजी झेंडे यांनी बुक्की न मारता टेंगूळ आणल्यासारखी अवस्था झाली आहे.
कारण संभाजी झेंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मतदार संघात संजय जगताप विरुद्ध विजय शिवतारे अशीच लढत होईल असे सर्वच मतदारांना वाटत असताना आज संभाजी झेंडे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून थेट उमेदवारी मिळाल्याने आता पुरंदर हवेली मतदारसंघात तिरंगी लढत होणार यात मात्र शंका नाही.