पुणे
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील काँग्रेस पक्षाचे मोठं नाव पुरंदर तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप आपल्या हाती कमळ घेणार असल्याच्या चर्चा होत होत्या. अखेर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून, काल १६ जुलै रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.त्यांच्या पक्षप्रवेशावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळा यांनी टीका केली आहे.
जाणारा माणूस ठरवून जातो. त्याला थांबविता येत नाही. अन्याय झाला, म्हणून कोणी जात नाही, तर स्वतःच्या संस्था वाचविण्यासाठी जातात. ते का गेले, हे तेच सांगू शकतील. सर्व काही मिळाले असताना संस्था वाचविण्यासाठी पक्ष सोडणे हा संधीसाधूपणा असल्याची जहरी टीका सपकाळ यांनी संजय जगताप यांच्यावर केली आहे.
सर्व काही दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस सोडली तिथे पुणे जिल्हाध्यक्षांचे काय असा खोचक टोलाही त्यांनी जगतापांना लगावला आहे. पुरंदरचे माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी १६ जुलै बुधवारी सासवड येथील पालखी तळावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनात जिल्हा काँग्रेसची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेतून ही टीका केली.