पुणे
पुणे शहराच्या कचरा डेपोमुळे पाण्यासाठी वणवण करणाऱ्या फुरसुंगी उरुळी देवाची येथील पाण्याच्या योजनेसाठी अखेर २४ कोटी रुपये देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग तिसरा शब्द पाळला आहे. राज्यातील सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पहिली टोलेजंग सभा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या पुरंदर हवेली मतदारसंघात घेतली होती. सासवड येथे झालेल्या या सभेत मुख्यमंत्र्यांनी दिलेला सलग तिसरा शब्द पाळला असल्याची माहिती विजय शिवतारे यांनी दिली आहे.
शिवतारे म्हणाले, ही ९३ कोटींची योजना सन २०१६ मध्ये मी राज्यमंत्री असताना मंजूर करून घेतली. ८० टक्के कामही पूर्ण केले. दुर्दैवाने २०१९ ला माझा पराभव झाल्यानंतर राज्यात आलेल्या महाविकास आघाडी सरकारने तीन वर्षात या योजनेला एक दमडीही दिली नव्हती. बारामतीला मात्र एसटी स्टँडला द्यायला या सरकारकडे २०० कोटी रुपये होते. तीन वर्ष काम बंद होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी थेट या योजनेवर भेट देण्यासाठी घेऊन गेलो. मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत शब्द देत आज तो पूर्ण केला. या भागातील जवळपास ४ लाख लोकांच्या वतीने मी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानतो.
सुळेंनी आणखी पोस्टसाठी तयार राहावे
सासवडच्या पालखी मैदानावर मुख्यमंत्र्यांनी दिलेला तिसरा शब्द आज पूर्ण केला आहे. मुख्यमंत्र्यांनी बारामतीकरांनी पळवलेले विमानतळ पुन्हा पुरंदरला दिले, शेतकऱ्याच्या उपसा योजना पुन्हा १९ टक्के दरात सुरू केल्या आणि आता फुरसुंगी उरुळी देवाची योजनेला पैसे मंजूर केले. पैसे मिळणार हे लक्षात येताच सुळे यांनी सोशल मिडियात पोस्ट करण्याची नौटंकी केली होती. यापुढे त्यांना फेसबुकसाठी आणखी विषय मी आत्ताच देत आहे. लवकरच पुरंदर हवेलीत राष्ट्रीय बाजार मंजूर होत आहे. गुंजवणीचे काम चालू होणार आहे. मनपात समाविष्ट गावातील टॅक्स प्रश्न निकाली निघणार आहे. सुळे यांनी त्यासाठीही पोस्ट तयार करून ठेवाव्यात असा टोला यावेळी शिवतारे यांनी लगावला आहे.