पुणे
ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले आणि भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीदरम्यान चिंचवडमध्ये हा प्रकार घडला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे यावेळी मोठा अनर्थ टळाला. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल होत आहे.
पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले असून जखमी झालेले ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन भोसले यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात दोन्ही गट परस्परविरोधी तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. थेरगांव श्रीकृष्ण कालोनी येथे ही घटना घडली.या मारहाणीत सचिन भोसले हे गंभीर जखमी झाले झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केल्याचा आरोप सचिन भोसले यांनी केला आहे.सचिन भोसले हे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा प्रचार करत होते. या प्रचारादरम्यानच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप सचिन भोसले यांनी केला आहे.
त्यांच्यावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून ते पोलिसांत नेमकी काय तक्रार देतात आणि कोणाविरोधात तक्रार देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.