सासवड
शालेय शिक्षण विभाग आयोजित ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये जि.प.प्राथमिक शाळा कदमवस्ती ता.पुरंदर या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला तर
जि.प.प्राथमिक शाळा उत्रोली ता.भोर शाळेने द्वितीय तर जि.प.प्राथमिक शाळा लोणीकंद ता. हवेली या शाळेने तृतीय क्रमांक पटकावला.
जिल्हा स्तरावर खाजगी शाळा प्रथम क्रमांक राजा रघुनाथराव विद्यालय,भोर.द्वितीय क्रमांक भारत चिल्ड्रेन अकॅडेमी ता. इंदापूर,तृतीय क्रमांक महात्मा गांधी विद्यालय, राजरुनगर या शाळांना मिळाला.
जिल्हा स्तरावर अनुक्रमे ११ लाख, पाच लाख आणि तीन लाख रुपये, तर तालुका स्तरावर अनुक्रमे तीन लाख, दोन लाख आणि एक लाख रुपये अशी पारितोषिके आहेत.
सुमारे ९५ टक्के शाळांमधील विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते. पाच ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान अभियान राबविण्यात आले. या वर्षी दुसऱ्या टप्प्यात सुमारे ९८ हजार शाळांमधून सुमारे एक कोटी ९१ लाख विद्यार्थी, तर सुमारे सहा लाख ६० हजार शिक्षक उपक्रमांत सहभागी झाले होते.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील व शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ पालक व सर्व अधिकारी यांचे अभिनंदन केले.
शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामस्थ,पालक व सर्व अधिकारी यांनी एकत्रित येऊन शाळेच्या विकासात योगदान दिले तर आदर्श शाळांची निर्मिती होते. शाळांची गुणवत्ता सुधारते व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारतो :संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद.
“कदमवस्ती शाळेला जागा कमी पडत असल्याचे पाहून जवळपास ५० लक्ष रुपये किमतीची ११ गुंठे जागा ग्रामस्थांनी शाळेसाठी मोफत दिली.तसेच अनेक मान्यवर,देणगीदार व लोकसहभागातून माळरान जागेवर अनंता व सुरेखा जाधव शिक्षक दांपत्यांनी विद्येचे ज्ञानमंदिर(नंदनवन) उभारले.याचा सार्थ अभिमान वाटतो.”- संदीप कदम,अध्यक्ष पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघ