मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) दहावा स्मृतीदिन आहे.स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं.
मुख्यमंत्री स्मृतीस्थळावरून जाताच तिकडे लगेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आले. त्यांनी स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत देखील उपस्थित होते. गद्दारांमुळे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ हे अपवित्र झाले आणि म्हणून तिथे गोमूत्र शिंपडून आम्ही ते पवित्र केले, असे म्हणत खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.
तसेच आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या आणि मग त्यांच्याबद्दल बोला असाही टोला अरविंद सावंत यांनी लगावला.आज म्हणजेच 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा 10 वा स्मृतीदिन आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केलं.
यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला.बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या दहावा स्मृतीदिन आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही त्यांना अभिवादन करायला आलोय. हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांच्या आठवणीशिवाय एक क्षणही जाणार नाही. ही वस्तूस्थिती आहे’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.