पुणे
पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे या शिक्षकाच्या आत्महत्येचा खुलासा आहे.या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर माणिकराव गायकवाड (वय ४४, मुळगाव, बार्शी, सोलापूर) असे गळफास घेणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
विक्रमगड तालुक्यातील मेढी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक होते.पोलीस तपासात मृत्यूपूर्वीची लिहिलेली सुसाईड नोट मिळाली असून पोटाच्या आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे गायकवाड यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये सांगितले आहे. विविध बँकेत असलेली बचत आणि फिक्स्ड डिपॉझिट खाती यांची माहिती ही या नोटमध्ये लिहून ठेवली आहे.
तसेच “माझ्या पत्नी आणि मुलीची काळजी घ्या, मला माफ करा,” अशा आशयाचा मजकूरही गायकवाड यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिला.गायकवाड हे विक्रमगडमध्ये राहत होते. तर शिक्षणासाठी त्यांची मुलगी आणि पत्नी या दोघी कल्याणला राहत होत्या. मुलीला आणि पत्नीला दररोज फोन करायचे. पण मंगळवारी रात्री ११ वाजेपर्यंत फोन आला नाही म्हणून गायकवाड यांच्या सहकाऱ्यांना फोन करून चौकशी केली.
जेव्हा त्यांचे सहकारी घरी पोहोचले तेव्हा घरातील आतील कडी लावलेली आहे आणि आतून कोणीही प्रतिसाद आणि हालचाल होत नसल्याचे लक्षात आले.काहीतरी विपरीत घडले याचा संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता गायकवाड यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी खोलीची पाहणी केली असता मृत्यूपूर्वी गायकवाड यांचे पत्र आणि आधारकार्ड आढळून आले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.