पुणे
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे जावई आणि माजी IPS अधिकारी शिवदीप लांडेंनी राजकारणात प्रवेश केला आहे. आज त्यांनी बिहारच्या पाटणा येथे पत्रकार परिषद घेतली.यात त्यांनी आपल्या पक्षाची घोषणा केली. ‘हिंद सेना’ असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे. यावेळी शिवदीप लांडे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली. तसेच त्यांचा पक्ष बिहारची विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी शिवदीप लांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून शिवदीप लांडे लवकरच राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चा रंगू लागल्या. ते आपले सासरे विजय शिवतारे यांच्या मतदारसंघातून म्हणजेच पुरंदर विधानसभेतून निवडणूक लढवतील, असं सांगण्यात येत होतं. मात्र तसं झालं नाही. तसेच बरेच दिवस राष्ट्रपतींनी लांडे यांचा राजीनामा स्विकारला नव्हता.
राजीनामा दिल्यानंतर ११७ दिवसांनी म्हणजेच १३ जानेवारीला राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्विकारला.शिवदीप लांडे हे २००६ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. बिहारमध्ये गुन्हेगारांचा थरकाप उडवणारे सुपरकॉप म्हणून त्यांना ओळखले जाते. बिहार केडरचे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्रातील अकोला येथील आहेत. बिहारमधून प्रतिनियुक्तीवर (डेप्युटेशन) मुंबईत गेल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये आयजी म्हणूनही काम केले होते.
महाराष्ट्रात पाच वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर जाण्यापूर्वी लांडे हे पाटणा शहराचे पोलीस अधीक्षक आणि मुंगेर आणि अररिया सारख्या जिल्ह्यांचे जिल्हा पोलीस प्रमुखही राहिले होते. त्यांनी मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी सेलचे पोलीस उपायुक्त म्हणून काम केले. २०२२ मध्ये ते बिहारमध्ये परतले आणि कोसी विभागाचे उपमहानिरीक्षक म्हणून कामकाज सांभाळले. नंतर त्यांना तिरहुत विभागाचे पोलिस महानिरीक्षक म्हणून बढती देण्यात आली. ६ सप्टेंबर रोजी त्यांची पूर्णिया येथे आयजी म्हणून बदली झाली होती. आपल्या दबंगगिरीमुळे ते बिहारमधील युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. आता त्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे.
आम्ही आणि माझा पक्ष बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना बिहारमध्ये बदल करायचा आहे किंवा ज्यांना बिहारमध्ये बदल हवा आहे, त्या सर्वांचे पक्षात स्वागत असेल. बिहारमधील तरुणांना बदल हवा आहे. अनेक राजकीय पक्षांनी मला राज्यसभेवर पाठवण्याची, मंत्री आणि मुख्यमंत्रीपदाची संधी देण्याची ऑफर दिली आहे, पण मला बिहारमध्ये बदल करायचा आहे, म्हणून मी नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.असे शिवदीप लांडे म्हणाले.