पुणे
भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन सुरू आहे. मात्र, पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात हेमंत ढमढेरे यांनी स्वतःच्या अंगावर शाही फेकून अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. ढमढेरे यांच्या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे.महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक विधाने केल्याने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर एका युवकाने शाई फेक केली. त्यामुळे अकरा पोलीस अधिकारी कर्मचारी निलंबित झाले. तर एका पत्रकाराला व्हिडिओ काढल्या प्रकरणी ताब्यात घेतले.

महापुरुषांच्या विरोधात बोलता आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करता हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचे सांगत महाजनहित प्रतिष्ठानचे महासचिव हेमंत ढमढेरे यांनी आपल्या स्वतःच्या अंगावर शाई फेकून सत्ताधारी मंत्री चंद्रकांत पाटील व प्रशासनाच्या विरोधात निषेध आंदोलन केले.थोर महामानवांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून शाईफेक केली तर पोलीस कारवाई करतात. त्यामुळे मी स्वतःच्याच अंगावर शाई ओतून या घटनेचा अनोख्या पद्धतीने निषेध करीत असल्याचे हेमंत ढमढेरे यांनी सांगितले.
यावेळी महाजननीत संघटनेचे सहसचिव अशोक राऊत, संजय मेहता उपस्थित होते. राज्यभर चंद्रकांत पाटील समर्थक त्यांच्या बाजूने आंदोलन करत आहेत. तर महापुरुषांचा अवमान केला म्हणून त्यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहेत. मात्र, हेमंत ढमढेरे यांनी स्वतःच्याच अंगावर चेहऱ्यावर शाई ओतून या घटनेचा निषेध केला हा प्रकार पुण्यामध्ये चांगलाच रंगला आहे.