मुंबई
राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारवर शिवसेनेकडून चौफेर फटकेबाजी केली जात आहे. ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी ‘शहाजी बापू पाटील तमाशातील सोंगाडे आहे, अशा शब्दात टीका केली. खासदार राऊत यांच्या टीकेला आमदार शहाजी बापू पाटील यांनी जोरदार प्रत्तुत्तर दिलं आहे.
मला सोंगड्याची उपमा देणारे विनायक राऊत हे काय तमाशातील नाच्या आहेत का ? असा पलटवार शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला. आमदार शहाजी बापू यांच्या टीकेनंतर शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय संघर्ष आणखी पेटला आहे.
शहाजी बापू पुढे म्हणाले, ‘कोकणात सभा घेऊन खासदार विनायक राऊत यांना उत्तर देणार आहे. त्यांनी आताच कानातला मळ काढून ठेवावा. सांगोल्यात येऊन माझ्यावर टीका केली असली, तरी मी येथे बोलणार नाही. पावसाळा संपल्यानंतर मी कोकणात सभा घेवून उत्तर देईल’.
उरल्या सुरल्या शिवसैनिकांची खासदार राऊत यांनी सभा घेतली. पन्नास साठ टुकार पोरांवर सभा घेण्याची वेळ आली आहे. मला सोंगाड्या म्हणणाऱ्या राऊत यांनी मागच्या सरकारमध्ये काय नाच्या म्हणून काम केले का ?’ असा टोलाही आमदार शहाजी बापू यांनी लगावला.
राज्य सरकारवर टीका करताना विनायक राऊत म्हणाले, शिंदे आणि फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले लोकहिताचे अनेक निर्णय रद्द केले आहेत.हे सरकार काहीही निर्णय घेऊ लागले आहे.त्यामुळे राज्यात काळू बाळूचा तमाशा सुरू असल्याचा भास होतो.
शहाजी बापू पाटील हा मिमिक्री करणारा माणूस आहे. ज्यांना तमाशा काढायचा आहे त्यांनी खुशाला तमाशात सोंगाड्या म्हणून घेवून जावे. ते चांगले काम करतील’. सांगोला तालुक्याला ही एक औदासा मिळाली आहे. ही औदासा घालवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहनही राऊत यांनी केले होते.