पुणे
भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं कर्करोगाने निधन झाल्यानंतर कसबा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणुकीत लढण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसने मला आदेश दिले तर मी निवडणूक लढवणार, अशी इच्छा रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केली आहेरुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कसबा पोटनिवडणुकीवर भाष्य केलं. रुपाली पाटील म्हणाल्या, ‘ मुक्ता टिळक यांचं आजारांनं निधन झालं आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कसबा पोटनिवडणुक झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मला आदेश दिले तर मी निवडणूक लढवणार आहे. मुक्ताताई 2019 विधानसभा निवडणुकीत आमदार झाल्यापासून आजारी होत्या. मुक्ता टिळक या आजारी असताना त्यांनी शक्य तेवढं काम केलं’.
अनेक ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या आहेत. कोणाचं दुःखद निधन झाल्यानंतर भावनिक म्हणून विचार होऊ शकतो. भाजपने अनेक ठिकाणी निवडणूक लावल्या आहेत,पंढरपूर,मुंबईमध्ये पोटनिवडणुक झाल्या, असे त्या पुढे म्हणाल्या.
‘कसबा मतदारसंघात असंही काम झाली नाहीत. खासदारही आजारी आहेत. मुक्ताताई यांच्या घरात तसेही कोणी निवडणूक लढवणार नाही. त्यात मुळात २०१९ साली मनसेने माझं तिकीट मुक्ता टिळक यांच्यासाठीच कापल होतं’, असा खुलासा रुपाली पाटील यांनी केला. रुपाली पाटील यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर कसबा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार, पोटनिवडणुकीत उमेदवार देणार का, हे पाहावे लागणार आहे.