सांगली
सांगली जिल्ह्यातील भोसे येथे मद्यपान करताना मित्रांना शिवीगाळ केल्याने भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की, दत्तात्रय शामराव झांबरे या तरुणाचा त्याच्या दोन मित्रांनीच खून केला. २८ जुलैपासून बेपत्ता असलेल्या दत्तात्रय झांबरे याच्या खूनप्रकरणी अमोल खामकर आणि सागर सावंत या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोघांनी मृत दत्तात्रय याच्या मृतदेहाचे तुकडे करुन कूपनलिकेच्या पाईपमध्ये टाकल्याची कबुली दिली आहे.
मिरज तालुक्यातील भोसे येथील दत्तात्रय झांबरे हा आपल्या मित्रांसोबत पार्टीला गेल्यानंतर बेपत्ता झाला होता. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याच्या कुटुंबीयांनी दत्तात्रय बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. पोलिसांच्या चौकशीत दत्तात्रय याचा खून मित्रांनीच केल्याचे निष्पन्न झाले.
भोसे येथे मिरज पंढरपुर रस्त्यालगत असलेल्या बंद पारस कारखान्यातील मोकळ्या खोलीत दारु आणि अंडयाची पार्टी करण्यासाठी दत्तात्रय झांबरे, त्याचे मित्र अमोल खामकर, सागर सावंत, वैभवकुमार जाधव हे गेले होते. यावेळी दत्ता झांबरे याने सागर आणि अमोल यांना यांना सिंगारेटचे पाकीट आणायला लावले. सिगारटचे पाकीट आणायला वेळ लागल्याने सागर आणि अमोल यांना शिव्या देत दत्ता कोयता घेवुन त्यांच्या अंगावर धावुन गेला. याचा राग येवुन सागरने दत्ता याच्या हातातील कोयता हिसकावुन घेत त्यास लाथ मारुन त्याच्या अंगावर कोयत्याने सपासप वार केले.
अमोल याने दत्ताला दगडाने डोक्यावर मारहाण केली. दत्तास ठार मारुन दोघांनी वैभवकुमार जाधव यास आम्ही दत्ताला संपविले आहे, तु येथून जा. याचे काय करायचे आहे ते आम्ही करतो. कोणाला काय सांगितलेस तर तुलाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे निष्पन्न झाले.
दत्तात्रय याच्या खूनप्रकरणी वैभवकुमार जाधव याने ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. अमोल खामकर आणि सागर सावंत यांना अटक करण्यांत आली आहे. दोघांनी दत्तात्रय याच्या मृतदेहाचे तुकडे करुन टाकल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती मिरजचे पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी दिली आहे.