सातारा
सांगली जिल्ह्यात काळीज पिवटळून टाकणारी घटना घडली. देवदर्शनावरून परतत असणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर आई-वडील गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना कर्नाटक राज्यातील हलूर जवळील जत-जांबोटी महामार्गावर घडली.
या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.इंद्रजीत मोहन ढमणगे (वय २९ वर्ष) आणि कल्याणी इंद्रजीत ढमणगे (वय २४ वर्ष, राहणार इस्लामपूर ) असं मृत्यूमुखी पडलेल्या नवदाम्पत्याचं नाव आहे.या अपघातात मृत इंद्रजीतचे आई-वडील जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपूर येथील इंद्रजीत यांचा १८ फेब्रुवारी रोजी कल्याणी हिच्याशी विवाह झाला होता. अगदी थाटामाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला.
लग्नानंतर या नवदाम्पत्यांनी आपल्या कुलदैवत असणाऱ्या कर्नाटक राज्यातल्या शाकांभरी देवीच्या दर्शनासाठी जाण्याचे ठरवले.त्यानुसार इंद्रजीत आणि कल्याणी आणि इंद्रजित याचे आई-वडील देवदर्शनाकरिता गेले होते. देवीचे दर्शन घेवून परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने इंद्रजीत यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत इंद्रजित आणि कल्याणीचा जागीच मृत्यू झाला.
तर इंद्रजीतचे वडील मोहन व आई मिनाक्षी हे गंभीर जखमी झाले आहेत.मृत कल्याणी यांचे माहेर इचलकरंजी आहे, तर इंद्रजीत हे मुंबई येथे टीसीएस कंपनीत नोकरीस होते. रविवारी पहाटे इस्लामपूर येथे नवदाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नवदाम्पत्यावर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.