सातारा
देशाची राजधानी दिल्लीत नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे देश ढवळून निघाला. एका मुलीसोबत चालत्या बसमध्ये घडलेला बलात्कार आणि त्यानंतर नराधमांनी तिची केलेली अवस्था पाहून संपूर्ण देश हळहळला. अशाच प्रकारची घटना मुंबईतल्या साकीनाका परिसरात घडली आहे. एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्यात आल्याची अतिशय संतापजनक घटना देशाची आर्थिक राजधानी मुंबईत घडली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासन कामाला लागले आहे.
या प्रकरणी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘साकीनाकाची घटना संपूर्ण मानवजातीला काळीमा फासणारी आहे. या प्रकाराचा दुःख, खेदही वाटतोच परंतु त्याहीपेक्षा मनस्वी संताप येतोय. महिला सुरक्षित नसतील असेल तर आपण विकासाच्या गप्पा कोणत्या धारणेवर करतो हा प्रश्न पडल्याचे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, अशा अत्याचारांच्या घटनांना सरकार जबाबदार!!!!! परंतु सर्व समाज आणि मानवजातही तितकेच दोषी आहेत. कायद्यात गुन्हेगारांना जरब बसेल अशा शिक्षांची तरतुद आयपीसी-१८६० मध्ये करणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने अत्याचाराच्या बाबतीत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन, वेगळी दंड संहिता अस्तित्वात आणायला हवी. या घटनेची शहानिशा तातडीने करुन, क्रूरकर्त्याला देहदंडाची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
दरम्यान, सह्याद्री अतिथीगृह येथे आज या प्रकरणाशी संबधीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे इत्यादी हजर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पीडित महिलेच्या मुलांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही असे सांगून या परिवारास महिला बाल कल्याण विभागाच्या मनोधैर्य योजनेतून तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आर्थिक सहाय्य तातडीने दिले जाईल. या महिलेच्या मुलांच्या शिक्षण व पालन पोषणाच्या बाबतीतही संबंधित विभागांना वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी सांगितले.