मुंबई
हौसेला मोल नसते असं म्हणतात. अनेक आपली किंवा आपल्या मुलांची हौस पूर्ण करण्यासाठी अमाप खर्च करतात. कधी कधी लाखो रुपये यात खर्च केले जातात. आपल्या मुलाची अशीच काहीशी हौस पूर्ण करण्यासाठी वसईतील एका व्यक्तीने लाखो रुपये खर्च केला आहे. या वाढदिवसाची परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
मुलाच्या वाढदिवसानिमित्त वसई पूर्वेकडील कामणमध्ये वडिलांनी तब्बल 3 लाख रुपयांच्या गाडीची प्रतिकृती असलेला २२१ किलोचा केक तयार केला. संपूर्ण वसईत या केकची चर्चा रंगली आहे.
कामण येथील नवीन भोईर यांचा मुलगा रियांश ह्याचा दुसरा वाढदिवस शनिवारी होता. वाढदिवसानिमित्त कामन येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला रथामध्ये मिरवणूक काढण्यात आली, त्यांनतर बँड व आकर्षक रोषणाई करत मुलाला स्टेजवर आणण्यात आले.वाढदिवसानिमित्त ह्यंडाई वेरना या कारची प्रतिकृती असलेला 221 किलोचा केक स्टेजवर पाहून उपस्थित मंडळीदेखील आश्चर्यचकित झाले.
स्टेजवर सजलेला हा वेरना गाडीचा केक पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. अनेकांनी या केकसोबत फोटो सेशनही केलं. आपल्या मुलाला वेरना कार खुप आवडते म्हणून त्याच्या दुसऱ्या वाढदिवसासाठी या कारचा केक तयार केल्याचं नवीन भोईर यांनी सांगितलं. तर रिशांशच्या पहिल्या वाढदिवशी हेलिकॉप्टरमधून त्यांची एन्ट्री करण्यात आली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.