फलक लावण्यावरून दोन गटांत दगडफेक; “या” सरपंचासह अनेक जण जखमी

फलक लावण्यावरून दोन गटांत दगडफेक; “या” सरपंचासह अनेक जण जखमी

पुसद

पुसद तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या शेंबाळ पिंपरी गावात आज सकाळी प्रभाग फलक लावण्यावरून धुमश्चक्री झाली. हिंदू आणि मुस्लिम समुदायातील दोन गटांत वाद होऊन एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली.

यात सरपंचासह दहा नागरिक जखमी झाले. शेंबाळ पिंपरी येथील वातावरण तणावग्रस्त असून पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आहे.

शेंबाळ पिंपरी येथील प्रभाग क्रमांक एकमधील जिजाऊनगरमध्ये जिजाऊनगरचा फलक असलेल्या जागेवर मोमीनपुरा हा नवा फलक लावण्याच्या वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाली. ही दगडफेक तीन ते चार तास चालू होती.

आज सकाळी साडेसात वाजता फलक लावण्याच्या वादावरून दोन्ही गट आमने-सामने आल्यावर बाचाबाची होऊन एकमेकावर दगडफेक सुरू झाली. तीन तासांपर्यंत खंडाळा पोलीस परिस्थिती हाताळत होते मात्र, दगडफेक काही थांबत नव्हती. यात पोलीस गाडीच्या काचाही फुटल्या.

अतिरिक्त कुमक दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. दगडफेकीमुळे रस्त्यावर दगडाचा मोठा खच पडला होता. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडून नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

परिस्थिती नियंत्रणात असून, पुसद पोलीस उपअधीक्षक अनिल आडे व उमरखेड पोलीस उपविभागीय अधिकारी पाडवी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तहसीलदार डॉ. राजेश चव्हाण हेही घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *