लातूर
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे शिरोळ वांजरवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले होते.परंतु वेळेवर राष्ट्रध्वज उतरवला नाही म्हणून आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेविका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी नवाज चाँदपाशा तांबोळी यांनी तक्रार दिली आहे.ते संध्याकाळी 7 वाजता शेतातून घराकडे परत जात असताना शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील राष्ट्रध्वज उतरवला नसल्याचे दिसून आले.आरोग्य सेविका अरुणा सूर्यकांत राठोड यांना त्यांनी मोबाईलवर संपर्क साधून राष्ट्रध्वज उतरवला नसल्याचे सांगितले.त्यांनी आशा कार्यकर्ती मुक्ताबाई बाळासाहेब जाधव यांना राष्ट्रध्वज उतरवण्यास सांगितल्याचे सांगून फोन ठेवून दिला.त्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांना आणि पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी येळेकर यांच्या हस्ते रात्री 9.30 वाजता राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक उतरवण्यात आला. राष्ट्रध्वज वेळेत उतरवला नाही म्हणून वैद्यकीय अधिकारी येळेकर आणि आरोग्य सेविका अरुणा सूर्यकांत राठोड यांच्याविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.