पुणे
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत यंदा विकासाच्या मुद्द्यांपेक्षा ‘गावकी-भावकी’ आणि मतविभाजनाचे गणित निकालाचा कौल ठरवणारे ठरले. एकाच गावातून रिंगणात उतरलेल्या दोन किंवा अधिक उमेदवारांमुळे मतांची फाटाफूट झाली आणि तिसऱ्याचा फायदा होत अनपेक्षित निकाल समोर आले.त्यामुळे पंचायत समितीच्या सत्तेची समीकरण बिघडली. पंचायत समितीत राष्ट्रवादी चार, भाजप दोन आणि शिवसेना दोन, असे बलाबल होऊन त्रिशंकू परिस्थिती झाली.
दोन जाधवांचा फायदा लोळेंना
सर्वात मोठी चुरस वीर- भिवडी गटात पाहायला मिळाली. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुष्कराज जाधव आणि शिवसेनेचे समीर जाधव हे दोन्ही उमेदवार एकाच परिंचे गावचे. परिंचेत पुष्कराज जाधव यांनी १०८९ मते, समिर जाधव यांनी ९६९; तर हरीभाऊ लोळे यांनी ३७३ मते घेतली. या लढतीत मतांच्या विभागणीचा थेट फायदा भाजपच्या हरिभाऊ लोळे यांना झाला,. त्यांनी ५५७ मतांनी विजय खेचून आणला. गटात हरिभाऊ लोळे यांना ११६३० मते, समिर जाधवांना ११०७३; तर पुष्कराज जाधव यांना ७०३८ मते मिळाली. अपक्ष हेमंतकुमार माहूरकरांनी १८७६ मते मिळवली. लोळेंना त्यांच्या पानवडी गावाने ९११ मतांचे मताधिक्य दिले.
धुमाळांना फटका, जगतापांना फायदा
वीर गणात शिवसेनेच्या प्रवीण जगताप यांनी भाजपच्या सुधीर धुमाळ यांचा केवळ १४९ मतांनी पराभव केला. या निसटत्या पराभवामागे स्वगावातीलच विरोधक कारणीभूत ठरले. धुमाळ यांच्या वीर गावातील काँग्रेसचे महेश धुमाळ (३०५ मते) आणि अपक्ष किशोर वचकल (३६९ मते) यांनी घेतलेली मते सुधीर धुमाळ यांच्या विजयातील मोठा अडथळा ठरली. याबरोबरच याच गणात ‘धुमाळ’च मात्र दुसऱ्या गावातील उमेदवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली. यामुळे तीन धुमाळ व वीरमधील तीन उमेदवारांच्या मतविभाजनाचा फायदा शिवसेनेच्या जगतापांना झाला. या गणात प्रविण जगतापांना ५९४०, सुधीर धुमाळांना ५७९१ आणि उत्तम धुमाळांना ३२६४ मते मिळाली. जगताप यांना त्यांच्या मांडकी गावाने निर्णायक १४५९ मतांची आघाडी दिली.
दोन जगताप- निंबाळकरांची सरशी
बेलसर गणातील एकाच आडनावाच्या आणि एकाच गावच्या उमेदवारांमध्ये संघर्ष झाला. राष्ट्रवादीचे नीलेश जगताप आणि भाजपचे कैलास जगताप यांच्यात त्यांच्या बेलसर गावतच मतांची विभागणी झाली. बेलसरमधून कैलास जगताप यांनी ७९८ मते, नीलेश जगताप यांनी ९९० मते; तर माणिक निंबाळकर यांनी ४३२ मते घेतली. यामध्ये दोन जगतापांच्या लढाईत खळद पंचक्रोशीने शिवसेनेच्या माणिक निंबाळकर यांच्या पारड्यात ६७२ मताधिक्य टाकल्यामुळे ४९९ मतांनी त्यांचा विजय सुकर झाला. यामध्ये खळद पंचक्रोशी किंगमेकर ठरली. निंबाळकरांना ४८०७ मते, नीलेश जगतापांना ४३०८ आणि कैलास जगतापांना ३६२८ मते मिळाली.
राष्ट्रवादीतील बंडखोरी भाजपाच्या पथ्यावर
बेलसर-माळशिरस गटात बंडखोरी आणि मतविभाजनाचा फटका राष्ट्रवादीला बसला. राष्ट्रवादीतून उमेदवारी न मिळाल्याने ठाकरे शिवसेनेकडून रिंगणात उतरलेल्या अमोल कामठे यांनी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलेल्या दत्ता झुरंगे आणि राष्ट्रवादीच्या गौरव कोलते यांची दमछाक केली. आधीपासून तयारी सुरू केलेल्या कामठेंनी घेतलेल्या ५९८१ मतांचा थेट फटका झुरंगे आणि कोलते यांच्या विजयाच्या समीकरणाला बसला, ज्याचा फायदा भाजपच्या पथ्यावर पडला. या लढतीत भाजपचे अजय इंगळे ७६२७ मते मिळवून १४२४ मतांनी विजयी झाले. प्रतिस्पर्धी दत्ता झुरंगे यांना ६२०३, अमोल कामठे यांना ५९८१, गौरव कोलते यांना ५८६७, शिवसेनेच्या रमेश इंगळेंना ५६८१ मतांवर समाधान मानावे लागले. विरोधकांतील यादवी आणि माजी आमदार संजय जगताप व सुदाम इंगळे यांची मिळालेली भक्कम ताकद अजय यांच्या विजयासाठी निर्णायक ठरली.

