पुरंदर
स्वस्त धान्याचे वितरण करण्यासाठी असलेली बायोमेट्रीक प्रणाली पुणे जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. परिणामी, रेशनकार्डधारकांना धान्य मिळत नसून ठिय्या मांडून स्वस्त धान्य दुकानांसमोर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
व्यवस्थेद्वारे वितरित करण्यात येणारे स्वस्त धान्य विकत घेण्यासाठी ई- पॉस मशिनवर नोंदणी करावी लागते. आधार कार्ड च्या आधारे बायोमेट्रीक प्रणाली पूर्ण झाल्याशिवाय धान्य मिळत नाही. पण, मागील आठ दिवसांपासून बायोमेट्रीक प्रणालीचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन वितरण थांबले आहे.
जरी या महिन्यात लाभार्थ्यांना धान्य नाही मिळाले तरी त्यांचे धान्य बुडणार नाही त्या धान्यासाठी लाभार्थ्यांना मुदतवाढ मिळेल : सुधीर बढदे,पुरवठा अधिकारी,पुरंदर
धान्यासाठी मजूर, शेतकरी यांच्यासह सर्वसामान्यांना तासनतास दुकानाच्या समोर थांबावे लागत आहे. दोन दिवसांत मशिन सुरु होतील, असे दुकानदारांनी सांगितले होते. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून मशिन चालू झाल्या नसल्यामुळे धान्य वाटप ठप्प झाले आहे.
यातच अनेक लाभार्थी धान्य देण्यासाठी हुज्जत घालत असल्याने तालुक्यातील लाभार्थांना धान्यापासून वंचित ठेवले जाता आहे.
पुरंदर तालुक्यात १०९ स्वस्त धान्य दुकानदार असून एकूण कार्ड संख्या ४७०६३एकूण युनिट २१६३४० लाभार्थी आहेत. यापैकी ४५ टक्के धान्याचे वाटप झालेले असून ५५ टक्के लाभार्थ्यांना धान्य मिळालेले नाही.