पुरंदर
तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव येथील मारुती मंदिरालगत सुरू असलेले सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून त्या कामाची चौकशी करावी अशी मागणी स्वप्नील पाटोळे यांनी केली आहे.
अधिक माहिती नुसार रिपब्लिकन पार्टीचे पुरंदर तालुका उपाध्यक्ष स्वप्नील पाटोळे यांनी पुरंदर बांधकाम विभागाला निवेदन सादर केले आहे यात म्हंटले आहे की नायगाव येथील मारुती मंदिर लगत सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे.ते निकृष्ट दर्जाचे सुरू असून त्या ठिकाणी कामाचा लेखाशीर्ष फलक लावण्यात आलेला नाही.
गणेश कंस्ट्रक्शन यांनी सदर काम घेतल्याचे पाटोळे यांना समजले असता पाटोळे यांनी गणेश कंस्ट्रक्शनचे मालक गणेश मुळीक यांना संपर्क केला असता सदर काम मी घेतलेले नाही त्या विषयी मला काही माहिती नाही असे मुळीक यांनी सांगितल्याचे पाटोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
हे काम कोण करतंय याचे उत्तर न मिळाल्याने अंदाजपत्रक व इतर माहिती विचारायची कोणाला असा प्रश्न पाटोळे यांनी विचारला आहे.
सदरचा रस्ता गावातील पालखी मार्ग असून दसऱ्याच्या दिवशी याच रस्त्यावरून पालखी मिरवणूक काढण्यात येते.पाच दिवसात काम पूर्ण करून रस्ता वापरात येणार असल्याने दर्जा कशा प्रकारचा राहील याची शाशंकता येत असल्यामुळे चौकशी करण्याची मागणी पाटोळे यांनी केली आहे.
पाटोळे यांच्या मागणीनंतर बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही.लोखंडे यांनी या कामाला केवळ पाहणी करून पळ काढला.
दरम्यान संबंधित काम घेतलेल्या ठेकेदार गणेश मुळीक यांच्याशी संपर्क साधला असता “त्या कामाचा व माझा काहीही संबंध नाही, ते काम माझ्या कंन्स्ट्रक्शन कंपनीने घेतलेले नसून निविदापत्रिकेवर देखील मी सही केली नाही” असे बोलताना त्यांनी सांगितले आहे.
मात्र या सर्व बाबींवरुन ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोगातुन होत असलेल्या कामांमध्ये बोगस ठेकेदार दाखवून ग्रामपंचायत सदस्यच ही कामे करत असल्याची चर्चा नायगाव परिसरात सुरू आहे. अशी बोगस कामे करणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासन आता कोणती कारवाई करणार? हे औत्सुक्याचे ठरणार आहे.