पुणे
पुरंदर तालुक्यातील सासवड-कापूरहोळ रस्त्यावर भिवडी जवळील हॉटेल रुद्राजवळ मंगळवारी (दि. 22) दुपारी बाराच्या सुमारास दुचाकी, टॅकरच्या धडकेत तरुण, तरुणीचा मृत्यू झाला.याप्रकरणी सासवड पोलिसांनी टँकर चालकास ताब्यात घेतले आहे.
नंदू रत्नाकर होले (वय 23 रा. खानवडी, ता. पुरंदर), अपूर्वा रवींद्र कुंभारकर (वय 23, रा. कुंभारवळण, ता. पुरंदर) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर हरिबा भिवा टोणे याला ताब्यात घेतलेल्या टँकरचालकाचे नाव आहे.
सासवडकडून नारायणपूर भरधाव निघालेली दुचाकी (एमएच 12 एक्सव्ही 9442) भिवडीजवळील हॉटेल रुद्राजवळ वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने दुचाकीची आणि इंडियन ऑइलचा टँकर (एमएच 12-6843) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक एवढी जोरात होती की दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर पोलीस शिपाई थोरवे व पोलीस कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.