पुणे
गुळुंचे येथील माळवस्तीतील एका अल्पवयीन मुलीचा विवाह केला जात असताना तो जेजुरी पोलिसांनी रोखला असून, नवरा मुलगा मुलाची आई, मुलीचे आई वडीलांसह पुरोहितावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद गुळूंचे गावचे पोलीस पाटील दिपक जाधव यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
गुळुंचे (ता.पुरंदर) येथील बालविवाह रोखण्यात आला असून पोलीस पाटील दीपक जाधव यांनी फिर्याद दिली आहे. गुळुंचे येथील १७ वर्षे १० महिने वय असलेल्या एका मुलीचा विवाह रविवारी माळवस्तीत होत होत. या घटनेची माहिती जेजुरी पोलीसांना मिळाल्याने जेजुरी व नीरा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विवाहाची तयारी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तो रोखला.
जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद घेत रविवारी रात्री आठच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात नवरा मुलगा गणेश पोपट जाधव (वय २७ वर्षे), मुलाची आई मंदाबाई पोपट जाधव दोघे राहणार माळशिरस (ता. पुरंदर) यांना तसेच मुलीच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पौरोहित्य करणाऱ्या किरण युबप्रसाद पौडेल सध्या रा. दत्तघाट नीरा पाडेगाव या पुरोहिताला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.